गोठलेल्या पाठय़पुस्तकाची गोष्ट

by acrutiapps

शिवछत्रपती’ हे सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. मात्र २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले.  पण हे बदल करताना  जी राजकीय चलाखी दाखवली गेली त्याला पाठय़पुस्तकांच्या इतिहासात तोड नाही. त्या बदलांवर आक्षेप घेणे, हा या लेखाचा हेतू नाही. हे पुस्तक गोठलेलेच राहिल्यामुळे शिक्षणशास्त्रीय निकषांशी ते कसे विसंगत ठरते, हे दाखवायचा आहे..
इयत्ता चौथीचं इतिहासाचं पाठय़पुस्तक – शिवछत्रपती – या वर्षी तब्बल ४३ वर्षांचं झालं. नऊ-दहा वयोगटाच्या मुलांना एकाच व्यक्तीचा इतिहास शिकविणारं आणि १९७० पासून सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं ‘शिवछत्रपती’ हे जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. या पाठय़पुस्तकात छोटय़ाशा बदलाचा प्रस्तावदेखील तणाव निर्माण करत असल्याचं या पाठय़पुस्तकाचा इतिहास आपल्याला सांगतो. १९९२ साली अशाच एका तणावाच्या काळात विधिमंडळातल्या प्रचंड गोंधळानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘हे पुस्तक कोणत्याही बदलाशिवाय आहे तसेच ठेवले जाईल’ अशी घोषणा विधानसभेत केली होती. याच घोषणेची री ओढत गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासक्रमातदेखील ‘इयत्ता चौथीच्या इतिहासात कोणताही बदल असणार नाही’ याची ग्वाही देण्यात आली आहे. ही ग्वाही ‘विद्या परिषदे’मार्फत (SCERT) राबवली गेली आहे. १९७० पासून कोटय़वधी मुलांनी ज्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला ते पुस्तक कोणतं संदर्भसाहित्य वापरून बनवलंय, याबाबत या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जबाबदार असणाऱ्या ‘बालभारती’कडेच कसलीही माहिती नसल्याचं, माहितीच्या अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरांदाखल खुद्द ‘बालभारती’ने म्हटलंय.

Advertisements