पुतळे आणि प्रतीके

by acrutiapps

पटेल नेहरूंपेक्षा मोठे होते आणि तरीही त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यासाठी आणखी एक पाऊल उचलावे लागते. ते असे की पटेल हे ‘राष्ट्रीय ऐक्याचे’ पुरस्कत्रे होते असे म्हणायचे आणि अप्रत्यक्षपणे असे सुचवायचे असते की इतरांना पटेलांच्या इतके राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व नव्हते!  अशाप्रकारे एक प्रतीक घडविण्यासाठी इतिहासातील संदर्भाची मोडतोड करावी लागते आणि वर्तमान संदर्भाची त्याला जोड द्यावी लागते.
सरदार पटेल कोणाचे, हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात बहुधा येणारही नाही; पण नरेंद्र मोदींनी नुकताच हा प्रश्न उभा केला. मोदी तिथे वादावादी, असे काहीसे झालेले दिसते; त्याचीच ही एक झलक! त्यातच मोदींचे समर्थक काही वेळा मोदींची तुलना सरदारांशी करतात आणि मोदी ‘दुसरे सरदार’ असल्याचे सुचवितात. त्यामुळे सरदार पटेल यांच्याविषयीचा वाद आणि त्याचे खोलवरचे धागेदोरे तपासणे उपयोगी ठरू शकते.
राजकारण हे खुर्चीसाठी असते आणि सत्तेसाठी असते तसेच ते प्रतीकांसाठी आणि विचारांसाठीसुद्धा असते. काही विचार आणि प्रतीके ही सत्तेसाठी उपयोगी असतात म्हणून त्यांचे राजकारण केले जाते, तर काही वेळा विचार आणि प्रतीके ह्या विषयीचे वाद हेच राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात.
सामूहिक राजकारणासाठी प्रतीके आवश्यक असतात. त्यामुळे प्रतीकांचा शोध घेण्यावर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते बरीच शक्ती खर्च करीत असतात. वर्तमानापेक्षा इतिहासात प्रतीके शोधणे नेहेमीच जास्त सोयीचे असते. त्यामुळे इतिहासात मागे जाऊन आपल्या वर्तमान सोयीसाठी पूर्वीच्या काळातील व्यक्तींना आपल्या पक्षाच्या आणि विचाराच्या दावणीला बांधण्याचे प्रयोग अनेक वेळा केले जातात. पण कर्तबगार राज्यकत्रे आणि प्रज्ञावंत नेते यांचे प्रतीकांमध्ये रूपांतर केले जाऊ लागले की त्यांच्या कर्तबगारीवर परस्परविरोधी दाव्यांचा थर चढू लागतो आणि त्यांची स्वतची कर्तबगारी आणि विचार मागे पडतात. कोणाचा किती उंच पुतळा उभा केला गेला यावर त्या मूळ नेत्यापेक्षा त्याचे स्मारक उभारणाऱ्यांची कर्तबगारी मोजली जाते.

http://www.loksatta.com

Advertisements