वेचीव लिखाण

मराठी भाषेतील वेचीव लिखाण!

Month: December, 2013

वार्षिक भविष्यफल

Click Here to check your 2014 horoscope.

Advertisements

गोठलेल्या पाठय़पुस्तकाची गोष्ट

शिवछत्रपती’ हे सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. मात्र २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले.  पण हे बदल करताना  जी राजकीय चलाखी दाखवली गेली त्याला पाठय़पुस्तकांच्या इतिहासात तोड नाही. त्या बदलांवर आक्षेप घेणे, हा या लेखाचा हेतू नाही. हे पुस्तक गोठलेलेच राहिल्यामुळे शिक्षणशास्त्रीय निकषांशी ते कसे विसंगत ठरते, हे दाखवायचा आहे..
इयत्ता चौथीचं इतिहासाचं पाठय़पुस्तक – शिवछत्रपती – या वर्षी तब्बल ४३ वर्षांचं झालं. नऊ-दहा वयोगटाच्या मुलांना एकाच व्यक्तीचा इतिहास शिकविणारं आणि १९७० पासून सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं ‘शिवछत्रपती’ हे जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. या पाठय़पुस्तकात छोटय़ाशा बदलाचा प्रस्तावदेखील तणाव निर्माण करत असल्याचं या पाठय़पुस्तकाचा इतिहास आपल्याला सांगतो. १९९२ साली अशाच एका तणावाच्या काळात विधिमंडळातल्या प्रचंड गोंधळानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘हे पुस्तक कोणत्याही बदलाशिवाय आहे तसेच ठेवले जाईल’ अशी घोषणा विधानसभेत केली होती. याच घोषणेची री ओढत गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासक्रमातदेखील ‘इयत्ता चौथीच्या इतिहासात कोणताही बदल असणार नाही’ याची ग्वाही देण्यात आली आहे. ही ग्वाही ‘विद्या परिषदे’मार्फत (SCERT) राबवली गेली आहे. १९७० पासून कोटय़वधी मुलांनी ज्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला ते पुस्तक कोणतं संदर्भसाहित्य वापरून बनवलंय, याबाबत या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जबाबदार असणाऱ्या ‘बालभारती’कडेच कसलीही माहिती नसल्याचं, माहितीच्या अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरांदाखल खुद्द ‘बालभारती’ने म्हटलंय.

बुकमार्क : पेसोआचा पेटारा

हा गेल्या शतकात इंग्रजीत आलेल्या जागतिक साहित्याचा नकाशा..  देशोदेशींच्या लेखकांनी ऐरणीवर आणलेल्या आधुनिक प्रश्नांची ठिकाणं दाखवणारा आणि साहित्याच्या अक्षांश-रेखांशांवर हे लेखक कुठे  आहेत, यावरही बोट ठेवणारा.. या सदराचा पहिला मानकरी आहे पोर्तुगीज साहित्यात एकहाती आधुनिकवाद आणणारा फर्नादो पेसोआ.
पोर्तुगीज कवी फर्नादो पेसोआला खुद्द पोर्तुगालमध्ये १९४० पर्यंत फारसं कोणी ओळखत नव्हतं. ३० नोव्हेंबर १९३५ या दिवशी लिस्बन शहरी राहत असलेला हा अठ्ठेचाळीस वर्षांचा कवी मरण पावला तेव्हा त्याच्या नावावर फक्त एक कवितासंग्रह, नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या दीडेकशे कविता, काही इंग्रजी कविता आणि काही समीक्षा व राजकीय स्वरूपाचे लेख इतकंच साहित्य जमा होतं.
पण पेसोआचा अमेरिकी अभ्यासक-अनुवादक रिचर्ड झेनिथ याने म्हटल्याप्रमाणे त्याचा लौकिक मृत्यू ही घटनाच एका ‘विशाल’ कवीच्या जन्माचा प्रारंभ होता. त्याच्या मृत्यूनंतर चार-पाच वर्षांनी त्याच्या घरातला मोठा पेटारा उघडण्यात आला आणि बाटलीतून महाकाय जीन निघावा तसा एक महाकाय अस्ताव्यस्त लेखक त्या पेटाऱ्यातून बाहेर आला. पेसोआचं तोवरचं प्रकाशित साहित्य हे केवळ हिमनगाचं टोक होतं याची अभ्यासकांना जाणीव झाली. त्या पेटाऱ्यात त्यांना एकोणतीस वह्य़ा आणि पंचवीस हजारांहून अधिक सुटे कागद – इतकं लेखन सापडलं. यातले काही कागद हस्तलिखित तर काही टंकलिखित होते. काही वाचताही येणार नाहीत इतक्या बारीक अक्षरांत लिहिलेले होते. त्यात शेकडो कविता, कथा, नाटकं, समीक्षा, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान, अनुवाद, राजकीय लेखन, ज्योतिष-गूढविद्या या विषयांवरचं लेखन असं सर्व प्रकारचं साहित्य होतं. अर्धवट राहिलेलं लेखन संख्येनं अधिक होतं. या कागदांचं संशोधन, संपादन करून, कागदांच्या त्या गुंताळ्यातून पेसोआच्या काही साहित्यकृती आकाराला आणण्याचा वाङ्मयीन उद्योग गेली सत्तर र्वष अव्याहतपणे चालू आहे.
पेसोआची टोपणनावांनी लिहिण्याची सवय त्याच्या हयातीतच पोर्तुगीज वाचकांच्या परिचयाची झाली होती. पण ही केवळ टोपणनावं नव्हती. त्या प्रत्येक नावाला पेसोआने लौकिक चरित्र (जन्म, शिक्षण, व्यवसाय), वैचारिक आणि वाङ्मयीन भूमिका इत्यादी गोष्टी बहाल केल्या होत्या. अल्बेर्तो कायरो, रिकार्दो रीस, अल्वारो-द-काम्पोस यांच्या नावांनी नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या कविता वाचकांनी वाचल्या होत्या. पण पेसोआचा पेटारा उघडल्यानंतर अभ्यासकांना कळलं की पेसोआने निर्माण केलेल्या अशा कवी-लेखकांच्या कल्पित व्यक्तिरेखांची एकूण संख्या पन्नासच्या आसपास होती. पेसोआने स्वत:च्या नावाने लिहिलेलं साहित्य तर त्यात होतंच. पण त्याशिवाय अनेक अनुवादक, तत्त्वज्ञ, राजकीय भाष्यकार, ज्योतिष-लेखक, इंग्रजीत लिहिणारे दोन कवी, फ्रेंचमध्ये लिहिणारा एक कवी आणि एक पोर्तुगीज भाषेत लिहिणारी कवयित्री यांचा देखील समावेश होता. या प्रत्येकाला आपापलं आयुष्य होतं. अल्वारो-द-काम्पोस हा नेव्हल इंजिनीयर असलेला कवी इंग्लंडमध्ये काही र्वष राहून आला होता, तर रिकार्दो रीस हा व्यवसायाने डॉक्टर होता. पेसोआने त्याला ब्राझीलला पाठवलं आणि तिथंच स्थायिक केलं. या ‘कल्पित’ कवींनी पेसोआच्या बरोबरीने केवळ कविताच लिहिल्या नाहीत, तर परस्परांच्या साहित्याची कठोर चिकित्सा करणारे लेख लिहिले, एकमेकांना पत्रं लिहिली; पेसोआशी आणि परस्परांशी आपापल्या भूमिकांतून वादविवाद केले. या संपूर्ण साहित्याची छाननी अद्यापही चालूच असल्याने, पेसोआचं फार कमी साहित्य आजवर मूळ पोर्तुगीजमध्ये आणि इंग्रजीमध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झालं आहे. पेसोआच्या या पेटाऱ्याचा तळ संशोधकांना अजूनही गवसलेला नाही.
आज समीक्षक म्हणतात, पोर्तुगीज साहित्यात आधुनिकवाद (modernism) पेसोआने अक्षरश: एकहाती आणला. आधुनिकवादातल्या दोन महत्त्वाच्या चळवळी, घनवाद (cubism) आणि प्रतिकवाद (symbolism) यांचा पेसोआ आणि अल्वारो-द-काम्पोस यांच्या कवितांवर प्रभाव आहे. अल्बेर्तो कायरोच्या कवितांमध्ये  झेन तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं; तर रिकाडरे रीसच्या कविता अभिजातवादाकडे झुकलेल्या आहेत. ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ (अस्वस्थ माणसाची नोंदवही) या ‘न-कादंबरी’चा निवेदक आणि नायक (किंवा ‘न-नायक’) बर्नार्दो सोरेस हा काफ्काच्या अस्तित्ववादी नायकांच्या कुळीतला, त्यांचा पूर्वसुरी शोभेल असा आहे. पेसोआच्या कवितांमुळे आणि ‘द बुक ऑफ डिसक्वाएट’, ‘द एज्युकेशन ऑफ द स्टॉइक’ या कादंबरीसदृश गद्य पुस्तकांमुळे तो रिल्के, रॅम्बो, बॉदलेअर, जेम्स जॉईस, काफ्का, काम्यू अशा विसाव्या शतकातल्या महान लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
साहित्याविषयीचे संकेत मोडणे हे आधुनिकवादातलं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. पेसोआने संकेतांना उद्ध्वस्त करण्याचं कार्य साहित्यनिर्मितीच्या सर्व पातळ्यांवर केलं. ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ हे महत्त्वाकांक्षी पुस्तक १९१३ पासून पुढे तो मृत्यूपर्यंत लिहीत होता. बर्नाडरे सोरेस हा लिस्बनमध्ये एकटेपण भोगत जगणारा कारकून आपल्या मनातले विचार लिहून ठेवतो, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्याची शेकडो पानं पेटाऱ्यातल्या निरनिराळ्या लिफाफ्यांमध्ये ठेवलेली सापडली. आयुष्याच्या टप्प्यावर अनेक वेळा त्याची या पुस्तकाविषयीची योजना बदलत गेली. एकदा नायकही बदलला. काही नोंदींवर पेसोआने क्रमांक घातले होते, तर काही नोंदी ‘बुक ऑफ डिसक्वाएट’मध्ये समाविष्ट करायच्या किंवा नाहीत याविषयी त्याच्या मनात शेवटपर्यंत संदिग्धता होती. त्यामुळे पेटाऱ्यात सापडलेल्या सर्व नोंदींची छाननी करून त्यापासून ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ची पोर्तुगीज भाषेतली अंतिम प्रत तयार व्हायला १९८२ साल उजाडावं लागलं. आणि त्यानंतरही प्रकाशित झालेलं हे पुस्तक निर्णायकरीत्या अंतिम प्रत आहेच असं म्हणता येणार नाही. इंग्रजीमध्ये या पुस्तकाची अनेक भाषांतरं उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक आवृत्तीत नोंदींची संख्या वेगवेगळी आहे, क्रम वेगळे आहेत. मूळ पोर्तुगीज आवृत्तीशी प्रामाणिक राहत सर्व नोंदी (अगदी संशयास्पद नोंदींसह) समाविष्ट असलेलं ‘बुक ऑफ डिसक्वाएट’चं इंग्रजी भाषांतर रिचर्ड झेनिथ याने केलं आहे. लेखन अर्धवट ठेवण्याची किंबहुना त्याला निश्चित ‘आकार’ न देण्याची पेसोआची प्रवृत्ती या एकाच पुस्तकापुरती मर्यादित नाही. ‘द एज्युकेशन ऑफ स्टॉइक’ या पुस्तकाचा कल्पित लेखक बॅरन ऑफ तीव्ह याने, आपण पुस्तकाला पूर्णत्व देऊ शकत नाही म्हणून आलेल्या निराशेपोटी आत्महत्या केल्याचं पेसोआने लिहून ठेवलं आहे. याशिवाय त्याच्या बऱ्याच कथा, नाटकंही अपूर्ण अवस्थेत सापडली आहेत. पेसोआसाठी लेखन ही आयुष्यभर निरंतर चालणारी कृती होती. त्यामुळेच पुस्तक लिहून संपवणं आणि ते प्रकाशित करणं या गोष्टी त्याला अप्रिय असाव्यात.
एखाद्या लेखकाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या सर्व साहित्यातून सुसंगतपणे उभं राहत असतं, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पेसोआने या समजुतीलाच सुरुंग लावला. त्याने साहित्य तर निर्माण केलंच, पण त्याचबरोबर या साहित्याच्या निर्मात्यांनाही निर्माण केलं. वाचक हे साहित्य वाचतो, तेव्हा त्यातून त्याला पेसोआच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा, भूमिकेचा थांगही लागत नाही. वाचकाला भेटतो तो रिकार्दो रीस किंवा बर्नार्दो सोरेस. स्वत:च्या लेखनापासून इतकं तटस्थ राहणं पेसोआला कसं साधलं असेल? इतरही लेखक कथा-कादंबऱ्यांतून पात्रांची निर्मिती करून त्यांना त्यांचे त्यांचे विचार, भूमिका देत असतातच. पण अशा पात्रांना त्या कथा-कादंबरीबाहेर मुळीच अस्तित्व  नसतं. अशी पात्रं निर्माण करणं वेगळं आणि त्यांच्या भूमिकेत शिरून कथा, कविता लिहीत राहणं वेगळं. रिकाडरे रीस किंवा अल्बेर्तो कायरो किंवा बर्नार्दो सोरेस हे त्यांच्या कविता-कादंबरीबाहेरही लेखांतून, पत्रव्यवहारांतून, त्यांच्याविषयी पेसोआने लिहिलेल्या नोंदींमधून अस्तित्वात आहेत. मुख्य म्हणजे पेसोआ जिवंत होता तोवर ते त्याच्या मनात अस्तित्वात होते. या ‘अस्तित्वा’त इतक्या साऱ्या लोकांची गर्दी असल्यामुळे मला स्वत:ची स्वतंत्र अशी जाणीवच उरलेली नाही’, अशी तक्रार पेसोआने नोंदवून ठेवली आहे. याचा दुसरा अर्थ असा की, पेसोआ आणि कंपनीने केलेलं संपूर्ण लेखन (कविता, कथा, नाटकं यांच्यासह त्यांची पत्रं, नमित्तिक लेख, नोंदी इत्यादी) ही एकच मोठी जगङ्व्याळ साहित्यकृती मानली पाहिजे. असं मानलं तरच पेसोआचा लेखक म्हणून अफाटपणा काही प्रमाणात समजून घेता येईल.    
पेसोआच्या संदर्भातली गुंतागुंत इथेच थांबत नाही. एका ठिकाणी अल्वारो-द-काम्पोस म्हणतो, ”फर्नादो पेसोआ, काटेकोरपणे सांगायचं तर, अस्तित्वातच नाही.” या विधानामुळे पेसोआ आणि त्याने निर्माण केलेले कवी-लेखक यांच्यातली, प्रत्यक्ष आणि काल्पनिक यांच्यातली, भेदरेषाच नाहीशी होऊन जाते. पुढे १९६०नंतरच्या नव्या जगात बार्थ, देरीदा आणि  फुको या तत्त्वज्ञांनी साहित्याची निर्मिती, लेखक या संकल्पनांविषयी मांडलेले नवे सिद्धांत पेसोआने विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्या ‘लेखनाच्या प्रयोगशाळे’त आपल्या पद्धतीने वापरून टाकले होते असं आता साहित्याचे काही अभ्यासक म्हणू लागले आहेत.
आज विश्वसाहित्यात मानाचं स्थान प्राप्त झालेल्या या लेखकाभोवती मिथकांची वलयं बरीच तयार झाली आहेत. पण त्याचबरोबर लेखक-कलावंतांवरच्या त्याच्या प्रभावाची वलयंही दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत आहेत. पास्कल मर्सयिर या जर्मन कादंबरीकाराच्या कादंबऱ्यांमध्ये पेसोआच्या साहित्याचे संदर्भ पेरलेले दिसतात. तर एन्रिक विला-मातास या स्पॅनिश लेखकाच्या जवळजवळ प्रत्येक कादंबरीत पेसोआ एक पात्र म्हणून भेटतो. मॅन्युएल-द-ऑलिविएरा या पोर्तुगीज दिग्दर्शकाच्या प्रत्येक चित्रपटात पेसोआचा एक तरी संदर्भ असतो. ‘द पोर्तो ऑफ माय चाईल्डहूड’ या चित्रपटात तर त्याने एका जुन्या चित्रफितीद्वारे प्रत्यक्ष पेसोआचंच दर्शन घडवलं आहे. इटालीयन कादंबरीकार आंतोनिओ ताब्बूची याने ‘द लास्ट फोर डेज ऑफ फर्नादो पेसोआ’ ही कादंबरी लिहिली आहे. पोर्तुगीज कादंबरीकार जुझे सारामागु याच्या ‘द इयर ऑफ डेथ ऑफ रिकार्दो रीस’ या कादंबरीत फर्नादो पेसोआच्या मृत्यूची बातमी वाचून ब्राझीलमध्ये स्थायिक झालेला रिकार्दो रीस हा त्याचा कवीमित्र पुन्हा पोर्तुगालमध्ये लिस्बनला परतून एका हॉटेलमध्ये उतरतो. कबरीतून बाहेर येऊन रीसला भेटतो. शेजारच्या स्पेनमध्ये तेव्हा यादवी युद्ध सुरू आहे. तिथले लाखो स्थलांतरित लिस्बनमध्ये आश्रयाला आले आहेत. त्या अस्थिर राजकीय-सामाजिक वातावरणात पेसोआने रीससोबत केलेल्या चर्चा म्हणजे ही कादंबरी.
थोडक्यात, पेसोआ आणि त्याच्या मांदियाळीच्या कविता आणि गद्य साहित्य आज इंग्रजीसह अनेक भाषांत भाषांतरित होत आहे. मराठीत पेसोआ फारसा कोणाला ठाऊक नसला तरी शेजारच्या हिंदीत तो बराचसा अवतरलेला आहे. ‘एक बेचन का रोजनामा’ हा ‘द बुक ऑफ डिसक्वाएट’चा हिंदी अनुवाद आहे. पेसोआने कल्पित लेखक-कवींच्या द्वारे सुरू केलेलं लेखन अद्यापही थांबलेलं नाही. आता तर ते त्या पेटाऱ्याबाहेर वेगवेगळ्या दिशांनी वाढत आहे. आणि पेसोआदेखील या लेखनात एक कल्पित लेखक म्हणून, पात्र म्हणून सामावला आहे. पेसोआचं हे जग खरोखरच अद्भुत आहे.
पुढील शनिवारच्या ‘बुकमार्क’मध्ये   गिरीश कुबेर यांचे ‘बुक-अप’ हे पाक्षिक सदर

http://www.loksatta.com

पुतळे आणि प्रतीके

पटेल नेहरूंपेक्षा मोठे होते आणि तरीही त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यासाठी आणखी एक पाऊल उचलावे लागते. ते असे की पटेल हे ‘राष्ट्रीय ऐक्याचे’ पुरस्कत्रे होते असे म्हणायचे आणि अप्रत्यक्षपणे असे सुचवायचे असते की इतरांना पटेलांच्या इतके राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व नव्हते!  अशाप्रकारे एक प्रतीक घडविण्यासाठी इतिहासातील संदर्भाची मोडतोड करावी लागते आणि वर्तमान संदर्भाची त्याला जोड द्यावी लागते.
सरदार पटेल कोणाचे, हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात बहुधा येणारही नाही; पण नरेंद्र मोदींनी नुकताच हा प्रश्न उभा केला. मोदी तिथे वादावादी, असे काहीसे झालेले दिसते; त्याचीच ही एक झलक! त्यातच मोदींचे समर्थक काही वेळा मोदींची तुलना सरदारांशी करतात आणि मोदी ‘दुसरे सरदार’ असल्याचे सुचवितात. त्यामुळे सरदार पटेल यांच्याविषयीचा वाद आणि त्याचे खोलवरचे धागेदोरे तपासणे उपयोगी ठरू शकते.
राजकारण हे खुर्चीसाठी असते आणि सत्तेसाठी असते तसेच ते प्रतीकांसाठी आणि विचारांसाठीसुद्धा असते. काही विचार आणि प्रतीके ही सत्तेसाठी उपयोगी असतात म्हणून त्यांचे राजकारण केले जाते, तर काही वेळा विचार आणि प्रतीके ह्या विषयीचे वाद हेच राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात.
सामूहिक राजकारणासाठी प्रतीके आवश्यक असतात. त्यामुळे प्रतीकांचा शोध घेण्यावर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते बरीच शक्ती खर्च करीत असतात. वर्तमानापेक्षा इतिहासात प्रतीके शोधणे नेहेमीच जास्त सोयीचे असते. त्यामुळे इतिहासात मागे जाऊन आपल्या वर्तमान सोयीसाठी पूर्वीच्या काळातील व्यक्तींना आपल्या पक्षाच्या आणि विचाराच्या दावणीला बांधण्याचे प्रयोग अनेक वेळा केले जातात. पण कर्तबगार राज्यकत्रे आणि प्रज्ञावंत नेते यांचे प्रतीकांमध्ये रूपांतर केले जाऊ लागले की त्यांच्या कर्तबगारीवर परस्परविरोधी दाव्यांचा थर चढू लागतो आणि त्यांची स्वतची कर्तबगारी आणि विचार मागे पडतात. कोणाचा किती उंच पुतळा उभा केला गेला यावर त्या मूळ नेत्यापेक्षा त्याचे स्मारक उभारणाऱ्यांची कर्तबगारी मोजली जाते.

http://www.loksatta.com

साने गुरूजी

 अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.

“ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा! तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!’ केशवसुतांचा `नवा शिपाई’ मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-

अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो…”

पु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. “शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान’ म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला.”

 

http://cooldeepak.blogspot.com/2009/12/blog-post.html

पुन्हा गळाभेट!

वसंतराव देशपांडे तल्लीन होऊन गात होते. पुढय़ात पु. ल. देशपांडे त्यांचं गाणं ऐकत बसले होते. तेही तेवढेच तल्लीन. ढगांचं दार लोटून सुनीताबाई कधी आत आल्या दोघांनाही कळलं नाही. समेवर पुलंनी आपला उजवा हात हवेत झटकून दाद दिली आणि डोळे उघडले तर पुढय़ात साक्षात सुनीताबाई उभ्या, कंबरेला पदर खोचून! पुलंच्या पोटात गोळा गोळाआला आणि चेहऱ्यावर अजीजीचे भाव आले.

 अगं? तू आलीस? आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थ झाल्या खेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजरा करायचा. बरं झालं आज नेमकी आलीस! भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ! असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेला पाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांग काहीतरी युक्ती मला.

 अगं? तू आलीस? आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थ झाल्या खेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजरा करायचा. बरं झालं आज नेमकी आलीस! भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ! असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेला पाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांग काहीतरी युक्ती मला.

 सुनीताबाई आल्यामुळं पुलंच्या अंगात नवा उत्साह संचारला. घर आवरत असलेल्या सुनीताबाईंना ते म्हणाले, आपल्या पृथ्वीवर तो अमृततुल्य चहा मिळतो ना, तर ते साफ खोटं आहे. खरं तर मी आता चहातुल्य अमृत शोधतो आहे, कारण चहाची गंमत अमृतात नाही. मग ते वसंतरावांकडे पाहत म्हणाले, वसंता, चल कुठं दूध, साखर आणि चहा-पत्ती मिळते का बघू जरा. वसंतराव पुलंचा बालसुलभ उत्साह कौतुकानं पाहत होते. त्यांनी पुलंना वास्तवाची जाण करून दिली. अरे पीएल, बाहेर जागोजागी अमृताच्या टाक्या बसवल्या आहेत, चहासाठी तुला कुंपण ओलांडून नरकात जावं लागेल. ते ऐकून पुलं म्हणाले, पृथ्वीवरचा प्रत्येकजण पुण्याऐवजी पाप गाठीशी बांधण्यासाठी का धडपडत असतो, ते इथं आल्यावर कळलं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, कारण जिवंतपणीच तो दिसला तर कोणीच तिकडे फिरकणार नाही. मग चहाचा नाद सोडून पीएलनी बैठक मारली आणि म्हणाले, अगं सुनीता, जी.ए. इथंच राहतात, दोन घरं सोडून. तुला जर त्यांना पत्र वगेरे लिहायची असतील तर मी आहे कुरियर सव्र्हिससाठी. किचनचा ओटा साफ करताकरता सुनीताबाई फणकाऱ्यानं म्हणाल्या, काही टोमणे मारायची गरज नाही भाई, मी त्यांना भेटायला जाणारच आहे.

 पण पुलं कसले गप्प राहतात? त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून! सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे? बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे? यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय? मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या! सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं!

 वसंतराव निघाले होते; पण मुगाच्या खिचडीचं नाव ऐकून ते थांबले. ते सुनीताबाईंना म्हणाले, अगं, इथं काही लिहिता येणार नाही त्याला, इथं फक्त मौज मजा करायची असते. काम करायला बंदी आहे इथं. त्यावर पुलं म्हणाले, आता ही आली आहे ना इथं, उद्यापासून इंद्र शेतात जाऊन नांगर धरेल आणि रंभा, उर्वशी जात्यावर बसून धान्य दळतील की नाही बघ! हे ऐकून सुनीताबाईंचा पारा चढणार, हे लक्षात घेऊन मग पुलंनीच विषय बदलला आणि म्हणाले, मी इथं आल्यानंतर तू किती देणग्या दिल्यास? कोणाला दिल्यास? मुगाच्या डाळीवर पाणी ओतत सुनीताबाई म्हणाल्या, भाई, अरे देणाऱ्याला दिल्याचं सुख मिळावं असे घेणारे सापडणं मुश्कील झालंय. आपलं आयुष्य संपलं हे भाग्यच म्हणायचं.. अस्वस्थ मनानं वसंतरावांनी तंबोऱ्याची गवसणी काढून पुन्हा सूर लावला.

 

लोकसत्ता, लोकरंग,

रविवार, १५ नोव्हेंबर २००९

http://cooldeepak.blogspot.com/

 पण पुलं कसले गप्प राहतात? त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून! सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे? बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे? यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय? मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या! सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं!

गुणाकार आणि भागाकार

मिरजमधल्या ‘मिरज विद्यार्थी संघा’चे एक धडपडे कार्यकर्ते वसंतराव आगाशे पुलंचे वर्गमित्र होते. एकदा एका समारंभाच्या निमित्ताने पुलं मिरजला गेले होते. त्यावेळी मिरज विद्यार्थी संघाने एक अद्ययावत सभागृह बांधायला घेतलं होतं. बांधकाम बरंच रखडलं होतं. पुलंनी वसंतरावांना विचारलं; ‘‘आतापर्यंत किती खर्च झालाय या बांधकामावर?’’ ‘‘अडीच लाख रुपये.’’ वसंतराव म्हणाले. ‘‘शिवाय अजून गिलाबा करायचाय, साऊंड सिस्टिम बसवायचीये, वरचा मजला बांधायचाय, परिसराचं सुशोभन करायचंय!’’ वसंतरावांनी बर्‍याच कामांची यादी पुलंना ऐकवली. पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे, आता माझ्याकडून किती मदत हवीये तुला तेवढं सांग!’’ पुलंच्या या जिव्हाळ्यानं वसंतराव पुरते भारावून गेले. ते म्हणाले; ‘‘भाई, एक रुपया दिलात तरी आम्ही धन्य धन्य होऊ!’’ वसंतराव आणि पुलंची ही भेट ज्या दिवशी झाली होती, तो दिवस विजयादशमीचा आदला दिवस होता. निरोप घेताना पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे वसंता; उद्या येतो शिलंगणाला!’’ दुसर्‍या दिवशी ते मिरज विद्यार्थी संघाच्या कार्यालयात पोहोचले. जाताना ते आपल्याबरोबर एक लाख रुपयांचा चेकच घेऊन गेले होते. तो चेक पाहून वसंतरावांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू वाहू लागले होते.

नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पुलंनी पन्नास हजार रुपये दिले. एक अद्ययावत, डौलदार सभागृह उभे राहिले. त्याचं उद्घाटन पुलंच्या हस्ते झालं. समारंभाला कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी उपस्थित होते. समारंभानंतर वाटवे नावाच्या एका सद्गृहस्थांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी सव्वा लाख रुपये मिरज विद्यार्थी संघाला दिली. चिंतामणराव गोरे नावाच्या आणखी एका गृहस्थाने वीस हजार रुपये दिले. ‘दिवा दिव्याने पेटतसे’ असं म्हणतात ते खरंच आहे. वसंतराव आगाशेंच्या चेहर्‍यावरून कृतज्ञता अक्षरशः ओसंडून वाहत होती.

आपल्या भाषणात पुलं म्हणाले; ‘‘जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा! खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी!’’ आयुष्याचं जटिल गणित सोडवण्याची यापेक्षा अधिक सोपी अशी दुसरी कोणती पद्धत असेल? पुलंनी त्या विजयादशमीला जे आनंदाचं, सुखाचं, माणुसकीचं सोनं लुटलं, मिरजेत त्याचा सुगंध आजही त्या सभागृहाच्या रुपानं दरवळतो आहे.

प्रकाश बोकील

— नवशक्ती

http://cooldeepak.blogspot.com/

जय मराठी !

मराठी भाषेतील वेचीव लिखाण तुम्हाला इथे उपलब्ध  दिले जाईल !